कठोर परिश्रम, जिद्द आणि क्रीडा क्षेत्रातील अद्भूत तपश्चर्येच्या बळावर ग्रामीण भागातील दोन नवोदित महिला खेळाडूंनी यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोगावती महाविद्यालय (कुरुकली) येथील राधिका अमित जाधव (इयत्ता १२ वी) आणि ऋतुजा वसंत कांबळे (बी.ए. भाग १) या दोन खेळाडूंची १८ वर्षांखालील आशियाई रग्बी स्पर्धेसाठीच्या भारतीय रग्बी संघाच्या सराव शिबिरामध्ये निवड झाली आहे.
संकटांवर मात करत गाठले यशाचे शिखर
राधिका आणि ऋतुजा या अत्यंत सामान्य ग्रामीण पार्श्वभूमीतून येतात. क्रीडा क्षेत्रात मुलींना येणाऱ्या कौटुंबिक व सामाजिक अडचणी, घरची प्रतिकूल परिस्थिती आणि आर्थिक मर्यादा अशा अनेक संकटांवर मात करत या दोन्ही रणरागिणींनी हे यश संपादन केले आहे.शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत भारतीय रग्बी संघाने त्यांची थेट राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड केली आहे. यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह भोगावती खोऱ्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
तज्ज्ञांचे लाभले मार्गदर्शन
या दोघींच्या क्रीडा प्रवासात त्यांना:श्री. दीपक पाटील (सचिव, कोल्हापूर जिल्हा रग्बी असोसिएशन व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक)श्री. अमर सासने (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा रग्बी असोसिएशन)श्री. राहुल लहाने (शारीरिक शिक्षण संचालक, भोगावती महाविद्यालय)श्री. जयदीप कारंडे (क्रीडा शिक्षक)यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभले.
या अलौकिक कामगिरीबद्दल भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री. दिगंबरभाऊ मेडशिंगे, व्हाईस चेअरमन श्री. मोहन पाटील व सर्व संचालक मंडळाने खेळाडूंचे विशेष कौतुक केले.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नेताजी पाटील, उपप्राचार्य डॉ. सुनील खराडे, उपप्राचार्य डॉ. निवास पाटील, कनिष्ठ विभागाच्या प्राचार्या सौ. आवडे मॅडम, रजिस्ट्रार श्री. अजित कांबळे, सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी दोघींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या या दोन्ही खेळाडूंवर सध्या संपूर्ण भोगावती खोऱ्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.