कुरुकली : भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथील बी.एस्सी. भाग-III (गणित) मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कु. प्रतीक मारुती टिपूगडे याने भारतीय वायुसेनेची AFCAT (Air Force Common Admission Test) परीक्षा उत्तीर्ण करून तसेच UPSC मार्फत घेण्यात येणारी अत्यंत खडतर पाच दिवसांची SSB (Services Selection Board) मुलाखत यशस्वीरित्या पार करत भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर (Class-I Officer) पदासाठी निवड मिळविली आहे.
कु. प्रतीक यांनी बी.एस्सी.च्या शिक्षणासोबतच अथक परिश्रम, जिद्द, शिस्तबद्ध तयारी आणि देशसेवेची प्रबळ इच्छा यांच्या जोरावर हे मानाचे यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भोगावती महाविद्यालय, गणित विभाग, कुरुकली गाव तसेच संपूर्ण परिसराचा गौरव वाढला आहे.
कु. प्रतीक यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गणित विभागातर्फे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून भारतीय वायुसेनेतील भावी कारकिर्दीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा व उज्ज्वल भवितव्यासाठी मंगलकामना देण्यात आल्या आहेत.
“आकाशाला गवसणी घालणाऱ्या या यशस्वी भरारीस सलाम!” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.