महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार, दिनांक १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत साजऱ्या होत असलेल्या “वन महोत्सव” मोहिमे अंतर्गत आज महाविद्यालयात वृक्षारोपणाचा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या संयुक्त विद्यमाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
वाढते तापमान, वायू प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास यांसारख्या गंभीर पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. याच उदात्त हेतूने पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अनुकूल काळात महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एम. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. ए. पी. कांबळे, प्रा. सयाजी पाटील, प्रा. पवन पाटील आणि प्रा. निरजन राजपूत उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी स्वतः वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ दिली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी NCC चे कॅडेट्स आणि NSS च्या स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. शासनाच्या नियमानुसार या उपक्रमाचे जिओटॅग फोटोग्राफ्स (Geotag Photos) आणि लावण्यात आलेल्या झाडांची संख्या याबाबातचा सविस्तर अहवाल मंत्रालयातील रासेयो कक्षाकडे पाठवण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या या पर्यावरणपूरक पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





