वाचन संकल्प महाराष्ट्राचा निमित्त व भोगावती महाविद्यालय कुरुकली ग्रंथालय व श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी ग्रंथालय विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअनुसरूनच दोन्ही महाविद्यालय ग्रंथालय विभागाचा असलेल्या MOU लिंकेज अंतर्गत दि. १४ जानेवारी २०२५ रोजी ऑनलाइन “वाचू आनंदे” याविषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेणेत आली. कार्यशाळेकरिता देशभरातून एकूण 154 सहभागीनी नोंदणी केली. प्रत्यक्षात १०२ सहभागी कार्यशाळेत ऑनलाईन सक्रीय सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोन्ही महाविद्यालयांचे मा. प्राचार्य होते. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात भोगावती महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री पी एस कल्लोळी यांनी उपस्थितांचे स्वागत व कार्यशाळेचे प्रास्ताविक केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांनी विद्यार्थी दशेत वाचनाचे महत्व, वाचन कौशल्ये कशी विकसित करावीत यावर सहभागीना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक श्री अमृत देशमुख (A Booklet Guy) हे होते. अमृत देशमुख हे देशभरात त्यांच्या वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्ना करिता सर्वपरिचित आहेत. त्यांनी प्रथम सत्रात “अभ्यासाचं पुस्तक वाचताना पंचाईत, तिथं इतर पुस्तकांची काय बात? तरुणाईमध्ये ‘कॉमन’ असलेल्या या प्रश्नावर खूप मार्मिक असे उद्बोधन केले. वाचन करताना होणाऱ्या सामान्य चुका: वाचन कौशल्य सुधारण्यासाठी टिप्स: प्रेरणादायी उदाहरणे: पुस्तके वाचून आत्मचिंतन आणि सृजनात्मक नवोपक्रम साध्य करण्याचे महत्त्व या व अश्या अनेक बाबींवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अंतिम टप्प्यात सहभागी विद्यार्थ्यांनी तसेच ग्रंथपालानी प्रश्नोत्तर रुपात मार्गदर्शकांशी संवाद साधला.
कार्यशाळेच्या शेवटी श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या ग्रंथपाल एम एम नायकवडी यांनी मार्गदर्शक, सहभागी महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच सर्व ऑनलाइन /ऑफलाईन उपस्थितांचे तसेच विद्यार्थ्यांचे आभार मानले.
कार्यशाळेकरिता दोन्ही महाविद्यालयातील सिनिअर ज्युनिअर विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नॅक कोऑर्डीनेटर विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.