कुरुकली, दि. २४ फेब्रुवारी २०२६ : भोगावती महाविद्यालय, कुरुकली (ग्रंथालय) आणि द न्यू कॉलेज, कोल्हापूर (ग्रंथालय) यांच्या संयुक्त विद्यमाने “Beyond Installation: Practical Daily Management of DSpace Repository” या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन कार्यशाळा उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.
शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन ग्रंथपाल संघटना (SUCLA) यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या कार्यशाळेला देशभरातील ग्रंथपाल, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व माहिती क्षेत्रातील व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत DSpace रिपॉझिटरीच्या दैनंदिन व्यवहार्य व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. नानाजी शेवाळे, ग्रंथपाल, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE), पुणे यांनी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सादरीकरण केले. त्यांनी इंस्टॉलेशननंतरची देखभाल, त्रुटीनिवारण (Troubleshooting), कार्यप्रवाह व्यवस्थापन, बॅकअप धोरणे, मेटाडेटा गुणवत्ता नियंत्रण तसेच कार्यक्षमता वृद्धी (Performance Optimization) यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. सहभागींच्या शंकांचे निरसन करून त्यांनी कार्यशाळेला अधिक व्यावहारिक स्वरूप दिले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. ए. चौगले, प्राचार्य, भोगावती महाविद्यालय, कुरुकली तसेच डॉ. व्ही. एम. पाटील, प्राचार्य, द न्यू कॉलेज, कोल्हापूर उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी डिजिटल युगात संस्थात्मक रिपॉझिटरीचे महत्त्व अधोरेखित केले व अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रंथालय क्षेत्र अधिक सक्षम होत असल्याचे सांगितले.
कार्यशाळेचे समन्वयक म्हणून कल्लोळी पी. एस., ग्रंथपाल, भोगावती महाविद्यालय, कुरुकली आणि डॉ. आर. पी. आडव, ग्रंथपाल, द न्यू कॉलेज, कोल्हापूर यांनी नियोजन व अंमलबजावणी यशस्वीरीत्या पार पाडली.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. एकंदरीत ही कार्यशाळा सहभागींसाठी ज्ञानवर्धक, उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरली.