भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथे दिनांक २५ जून २०२५ रोजी महिला जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा ग्रंथालय हॉलमध्ये पार पडली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री. किशोर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, करवीर पोलिस ठाणे, कोल्हापूर यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत आणि कायदेशीर अधिकारांवर सखोल मार्गदर्शन केले.
श्री. किशोर शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की महिलांनी आत्मरक्षणाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे, तसेच कोणतीही शंका अथवा संकट आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांनी सायबर गुन्हेगारी, स्टॉकिंग, ॲसिड हल्ले, आणि सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी यावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थिनींना “आपली सुरक्षा, आपल्याच हाती आहे” हा संदेश दिला.
डॉ. डी. एल. कांबळे सरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजच्या युगात महिलांनी फक्त शिक्षणातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे लागेल. महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी कायद्या-संविदाने दिलेले अधिकार समजून घेणे गरजेचे आहे.”
त्यांनी विद्यार्थिनींना आवाहन केले की, “सामाजिक माध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगा, आणि कोणत्याही प्रकारच्या मानसिक, शारीरिक किंवा सायबर त्रासासंदर्भात गप्प न बसता योग्य वेळी योग्य व्यक्तीशी संपर्क साधा.”
ते पुढे म्हणाले, “महाविद्यालय हे केवळ शिक्षणाचे नव्हे तर मूल्यांचे केंद्र आहे. आम्ही विद्यार्थिनींसाठी एक सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य डॉ. डी. एल. कांबळे, प्रा. सौ. आवळे मॅडम, तसेच महाविद्यालयाचे इतर शिक्षक व विद्यार्थिनींचा सहभाग होता. डॉ. कांबळे सरांनी विद्यार्थिनींना प्रेरणा देणारे विचार मांडले व असे कार्यक्रम सातत्याने घेण्याचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले सर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “महिलांचा सशक्त विकास हीच खरी प्रगतीची दिशा आहे. महिला सक्षम असतील तरच समाज आणि राष्ट्र सक्षम होईल.” त्यांनी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी अधिकाधिक उपयुक्त उपक्रम राबवले जातील, असे आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. सौ. आवळे मॅडम आणि इतर शिक्षकवर्ग यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम अधिक प्रभावी बनविला.


