कुरूकली (ता. करवीर) – भोगावती महाविद्यालय, कुरूकली येथे दिनांक 04 ऑगस्ट 2025 रोजी “विद्यार्थी मार्गदर्शन कार्यशाळा” संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय हॉलमध्ये करण्यात आले होते. कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे, महिला सुरक्षेची माहिती देणे आणि पोलीस यंत्रणेची भूमिका समजावून सांगणे हा होता.
प्रमुख मार्गदर्शक:
कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुजितकुमार शिरसागर सर, पोलीस निरीक्षक मा. किशोर शिंदे सर, आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (महिला दक्षता विभाग) मा. सौ. स्वाती यादव मॅडम यांनी सहभाग घेतला. मा. शिरसागर सर यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे मूलभूत ज्ञान, शिस्त, नागरिक म्हणून जबाबदारी आणि पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. मा. शिंदे सर यांनी गुन्हेगारी टाळण्यासाठी कायदे पालनाचे महत्त्व सांगितले. मा. स्वाती यादव मॅडम यांनी महिला विद्यार्थिनींना महिलांसाठी असलेल्या संरक्षणात्मक कायद्यांची माहिती दिली. त्यांनी आत्मरक्षण, सायबर सुरक्षा, आणि कायदेशीर सहाय्य यावर विशेष भर दिला.




कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजन:
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. दिगंबर मेडशिंगे सर, अध्यक्ष, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ हे होते. मा. श्री. मोहन पाटील सर, उपाध्यक्ष, यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्षीय भाषणात त्यांनी युवकांनी सजग नागरिक म्हणून विकसित व्हावे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
कार्यशाळेची सुरुवात प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला आणि उपस्थितांचे स्वागत केले.कार्यशाळेचे समन्वयन प्रा. पवन पाटील सर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. एन. एम. साळोखे, सांस्कृतिक विभागप्रमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. सहभागी विद्यार्थ्यांनी कायदे, महिला सुरक्षा, आणि समाजातील जबाबदारी याविषयी मौल्यवान माहिती मिळाल्याचे सांगितले.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरूकता आणि सामाजिक भान निर्माण करणारी ठरली.